रत्नागिरी:- जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळांचा धोका वाढला आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र दिवसेंदिवस हे काम लांबणीवर पडत गेल्याने नागरिकांची सुरक्षा अजूनही वाऱ्यावरच आहे. निवारा केंद्राच्या पहिल्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने ती रखडली होती. आता जिल्ह्यातील तिन्ही चक्रीवादळ निवारा केंद्रांचे नवीन आराखडे (नवीन प्लॅन) तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे निवारा केंद्रांच्या कामाला आणखी विलंब होणार आहे. नवीन केंद्र जी प्लस फोर असण्याची शक्यता आहे.
पत्तन विभागच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. हे अधिकारी नव्या प्रस्तावाच्या तयारीत आहेत. याचा आराखडा मंत्रालयातील वास्तूशास्त्र विभागाकडून केला जाणार आहे. जिल्ह्याच्या किनाऱ्यावर फयान वादळ धडकले आणि त्याने हाहाकार माजवला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वित्त तसेच जीवितहानी झाली. त्यानंतर कोकण किनारपट्टीवर वारंवार वादळे घोंगावू लागली. भविष्यात हे प्रमाण वाढतच राहणार असल्याचे हवामानखात्याने स्पष्ट केले. त्याची प्रचितीही गेल्या वर्षी आली. निसर्ग वादळाने जिल्ह्याच्या किनाऱ्यावर पुन्हा हाहाकार माजवला. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. त्यातून अजून नागरिक सावरलेले नाहीत. ही वस्तुस्थिती असतानाही अजूनही किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शासन आणि प्रशासन गंभीर असल्याचे दिसत नाही.
चक्रीवादळापासून किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात तीन राष्ट्रीय चक्रीवादळ निवारा केंद्र मंजूर आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे, दापोली ताक्यातील दाभोळ आणि हर्णै येथे केंद्रांसाठी जागा निश्चित झाली आहे. २०१८ पासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पत्तन विभाग त्यासाठी प्रयत्न करत आहे. तिन्ही कामे प्रत्यकी ३ कोटीची होती; मात्र या कामांच्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने केंद्राची कामे रखडली आहेत. दरम्यान, शासनाने या तिन्ही निवारा केंद्राच्या कामाचा नवीन आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पत्तन विभाग कामाला लागला असला तरी केंद्रांचा अंदाजपत्रही वाढणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवर केंद्र उभारणीचे काम लांबत असल्याने किनारी भागातील सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे.