रत्नागिरी:- इंग्लडसह युरोपीय देश, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये रत्नागिरीच्या हापूसला मोठी मागणी आहे. मँगोनेटमुळे निर्यातदार थेट बागायतदारांकडे जात आहेत. निर्यातीपुर्वी आवश्यक प्रक्रिया रत्नागिरीतच करण्यासाठी नाचणे येथे आंबा प्रक्रिया केंद्र उभारले आहे. 2006 पासून 2020 पर्यंत केंद्रातून 256 मेट्रीक टन आंबा निर्यात करण्यात आला आहे. तसेच 820 मेट्रीक टन आंब्यावर प्रक्रिया करुन दर्जेदार फळं बाजारात ग्राहकांना उपलब्ध करुन दिले आहे.
कृषी निर्यात धोरणांतर्गत कृषी पणन मंडळ व अपेडा यांच्या अर्थसहाय्याने निर्यात सुविधा केंद्र रत्नागिरीत नाचणे येथे 2004 साली उभारण्यात आले. आंतरराष्ट्रीय देशांच्या निकषानुसार युरोपीय देश, साउथ कोरीया, रशिया, मॉरिशस, इराण या देशांना निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उष्ण जल प्रक्रिया निर्यात सुविधा केंद्रात उपलब्ध आहे. जपान, न्युझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांना निर्यातीसाठी प्रामुख्याने व्ही एच टी आणि विकिरण सुविधा वाशीत उपलब्ध आहे. तिथे आंबा पाठविण्यापुर्वी करावी लागणारी प्राथमिक प्रक्रिया रत्नागिरीत उपलब्ध आहे. यामध्ये हाताळणी कमी झाली असून फळाचा दर्जा टिकवणे शक्य होत आहे. या केंद्रात प्रशितकरण, शीतगृह, रायपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा, प्रतवारी व पॅकींग यांची अद्ययावत यंत्र सामग्री उपलब्ध आहे.
रत्नागिरीतील केंद्रातून 2006 ला पहिल्या वर्षी येथून 9.5 मेट्रीक टन आंबा निर्यात झाला. 2007 साली 39.02 मेट्रीक टन, 2009 ला 41 मे. टन निर्यात झाली. त्यानंतर दरवर्षी कमी अधिक प्रमाणात निर्यात सुरु झाली. 2019-20 ला 32.70 मेट्रीक टन आंबा निर्यात झाला. गतवर्षी कोरोनामुळे मोठा फटका बसला. 1.5 मे. टन आंबाच निर्यात झाला. 2006 ते 2020 या चौदा वर्षांच्या काळात 256 मे. टन आंबा निर्यात झाला. तसेच 820 मेट्रीक टन आंब्यावर प्रक्रिया करुन तो देशाच्या विविध भागातील विक्रेत्यांकडे पाठविण्यात आला. सध्या हे केंद्र सद्गुरु एंटरप्रायझेसकडे चालवण्यास दिले आहे.









