रत्नागिरी:- आपल्या राजकीय भूमिकेपेक्षा कौटुंबिक स्नेह आणि शहराच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि त्यांची कन्या सौ. शिवानी सावंत-माने यांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने, शहराच्या नागरी सुविधांच्या दुरवस्थेवर त्यांनी गंभीर टीकास्त्र सोडले.
श्री. सावंत यांनी स्पष्ट केले की, शहराला पाणी ही जीवनावश्यक वस्तूही पूर्णपणे उपलब्ध होऊ शकली नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्यांनी 2016 मध्ये मंजूर झालेल्या 54 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट ठेवले. तत्कालीन प्रशासनाने ही योजना अपूर्ण स्थितीत आणि तांत्रिक पाहणी न करता ताब्यात घेतली, ज्यामुळे नागरिकांना आजवर सुरळीत पाणी मिळालेले नाही. 2025 पर्यंतही ही योजना पूर्ण होऊ शकली नाही आणि ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्यानंतर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. येणाऱ्या नवीन प्रशासनाने या योजनेचा तातडीने पुनरावलोक करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी त्यांची मागणी आहे.
विकासकामांच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना श्री. सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे पुतळे तसेच शिवसृष्टी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले गेले, ज्यासाठी नगरपरिषदेला मोठा आर्थिक वाटा उचलावा लागला. याऐवजी, गटार, मीटर आणि भुयारी गटार योजना यांसारख्या मूलभूत सुविधांवर पैसे खर्च करणे अधिक गरजेचे होते. शहरातील भुयारी गटार योजनेचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) जुना झाला असून, पाण्याच्या समस्यांमुळे वारंवार रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. तसेच, इंदिरा आवास योजनेतील नागरिकांच्या जागेच्या मुदतवाढीचा प्रश्न न सोडवल्याबद्दल त्यांनी प्रशासनावर टीका केली.
राजेश सावंत यांनी कबूल केले की, नेतृत्वाच्या अभावामुळे नगर परिषद दुसऱ्यांदा (2011 नंतर आता 2025 मध्ये) आर्थिक संकटात सापडली आहे. नगरपरिषदेच्या कारभारावर नेतृत्व कसे आहे, यावर संस्थेची स्थिरता अवलंबून असते. आपल्या कन्येच्या माध्यमातून शहराला सक्षम आणि सेवाभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना नागरी समस्या सोडवणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असूनही, त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे रत्नागिरीच्या राजकारणाला निवडणुकीच्या तोंडावर एक वेगळी दिशा मिळाली आहे.









