रत्नागिरी:- रजेचा अर्ज मुंबईला पाठवल्याच्या रागातून तालुक्यातील जयगड लाईट हाउस येथील नौचालन सहाय्यकास तेथील सफाई कामगाराने काठीने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वा. घडली.
गजानन नंदकुमार माने (48,रा. जयगड सडेवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात अजित कुमार गुप्ता (29, मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा.जयगड लाईट हाउस नांदिवडे,रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी संशयित गजानन माने हा लाईट हाउसमध्ये आला आणि त्याने अजित गुप्ताला तुम्ही माझ्या रजेबद्दल मुंबईला का कळवले,यापूर्वी असे कधी झाले नसल्याबाबत विचारणा केली. तेव्हा अजित गुप्ताने त्याला 3 दिवस रजा देण्याचा मला अधिकार आहे. त्यावर रजा हवी असल्यास मला वरिष्ठांना कळवावे लागते असे सांगितले.
मी तुला रजेसाठी अडवलेले नाही. याचा राग आल्याने गजानन मानेने अजित गुप्ताला शिवीगाळ व धक्काबुक्की करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ऑफीसच्या दरवाजाजवळील काठी फिर्यादीच्या डोक्यात मारुन दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता 35(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.