राजापूर भालावली येथील घटना
राजापूर:- तालुक्यातील भालावली गावात २० जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणातील आरोपीला जिल्हा न्यायालयाने अखेर जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. भालावली येथील दोन महाविद्यालयीन युवतींवर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, ज्यात एका युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या क्रूर गुन्ह्यात आरोपी असलेल्या विनायक शंकर गुरव याला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून ही शिक्षा ठोठावली आहे.
ही हृदयद्रावक घटना १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास भालावली वरी गुरववाडी परिसरात घडली होती. गावातील गुरववाडीत सुतक-सुवेर पाळणे आणि गावच्या देवाचा उत्सव साजरा करण्यावरून दोन गटांमध्ये वाद होता, याच वादाच्या ठिणगीतून हे गंभीर प्रकरण घडले. मयूर मुकुंद गुरव (वय २४, रा. वरी गुरववाडी) यांच्या वडिलांकडे आणि काकांकडे गावातील नवदुर्गा मंदिराचे ‘देव दास्तान’ होते. हे दास्तान दुसऱ्या गटाला मान्य नव्हते आणि ते दास्तान परत मागत होते. मात्र, मयूर यांच्या गटाने ते देण्यास नकार दिल्याने वादी गटातील लोकांना प्रचंड राग होता, ज्यामुळे ते मयूर यांच्या कुटुंबाला वारंवार त्रास देत होते.
या वादी गटातील आरोपी विनायक गुरव याचे घरकुल मयूर गुरव यांच्या गटातील व्यक्तींच्या जागेत मंजूर झाले होते. त्या व्यक्तींनी न्यायालयामार्फत या बांधकामाला स्थगिती आणली होती. यामुळे विनायक गुरव याला मयूर गुरव यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावर प्रचंड राग होता. याच रागातून आणि सूड भावनेतून विनायक याने हा खून घडवून आणला असावा, असा पोलिसांचा संशय होता.
१८ जानेवारी २०२३ रोजी मयूर गुरव यांची बहीण साक्षी आणि तिची शेजारीण मैत्रीण सिध्दी संजय गुरव या दोन्ही महाविद्यालयीन मुली भालावली येथील महाविद्यालयातून घरी पायी जात होत्या. आरोपी विनायक गुरव याने संतोष गुरव यांच्या आंबा बागेजवळ रस्त्यात त्यांना गाठले. “तुम्ही सुवेर-सुतक पाळत नाही आणि देवाचे दास्तानही देत नाही! मी तुमचे खानदान संपवून टाकतो!” अशी धमकी देत विनायक गुरव याने त्यांच्यावर लाकडी दांड्याने जोरदार हल्ला चढवला. त्याने दोघींच्याही डोके आणि मानेवर दांड्याने प्रहार केले. या प्राणघातक हल्ल्यात कुमारी साक्षी आणि सिध्दी या दोघीही गंभीर जखमी झाल्या. सिध्दी गंभीर अवस्थेत तेथून पळून गेली, तर साक्षी बेशुद्धावस्थेत खाली पडली. शेजारी राहणारे संजय गुरव यांनी मयूर यांना फोनद्वारे ही माहिती दिली.
मयूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेतील दोघींनाही धारतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी साक्षी हिला मयत घोषित केले. मयूर यांनी राजापूर नाटे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.दं.वि.क. ३०२ (खून), ३२६ (प्राणघातक हल्ला), ५०६ (ठार मारण्याची धमकी) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी विनायक गुरव याला अटक केली. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जिल्हा न्यायालयात या खून खटल्याची अंतिम सुनावणी झाली.
या खटल्यात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. अनाध्द फणसेकर यांनी काम पाहिले. न्यायालयात एकूण १४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. साक्षीदारांच्या जबान्या ग्राह्य मानत जिल्हा न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला वरील सर्व आरोपांखाली दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.









