युकेमधील मित्राने उद्यमनगर येथील प्रौढाला घातला २२ लाखांचा गंडा

‘इमिग्रेशन ऑफिसर’ असल्याचे सांगून फसवणूक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय नोकरदार व्यक्तीला ऑनलाईन मैत्री महाग पडली आहे. युनायटेड किंगडममधील कथित मित्र आणि दिल्लीतील तोतया इमिग्रेशन ऑफिसर यांनी संगनमत करून तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

​फिर्यादी सलील अब्दुल कादीर काझी (वय ४५, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांची एका वेबसाईटवर टिआगो फॉरा (रा. युनायटेड किंगडम, इंग्लंड) नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
​२२ जुलै २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत, आरोपी टिआगो याने सलील यांना व्हॉट्सअँपच्या माध्यमातून संपर्क साधला. आरोपीने बनाव रचला की, “दिल्ली इमिग्रेशन विभागाने मला ६० हजार युके पाउंड आणि सोने बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.”

​या कटात आरोपी क्रमांक २, स्वतःला दिल्लीतील पासपोर्ट इमिग्रेशन ऑफिसर म्हणवून घेणारी प्रिया शर्मा हिने देखील सहभाग घेतला. या दोघांनी सलील यांना पटवून दिले की, हे ६० हजार पाउंड आणि सोने भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी तसेच टिआगोला इमिग्रेशनमधून सोडवण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. ही रक्कम भरल्यास टिआगो सुटका झाल्यावर सर्व पैसे परत करेल, असे खोटे आश्वासन देण्यात आले.

​आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सलील काझी यांनी आपल्या आयसीआयसीआय आणि एचएसबीसी बँक खात्यांवरून वेळोवेळी एकूण २२,२१,४०० रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. मात्र, इतकी मोठी रक्कम देऊनही आरोपींनी ती परत न करता सलील यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

​या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रविवार, १ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी टिआगो फॉरा आणि प्रिया शर्मा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.