यावर्षी उष्णतेच्या लाटा एक महिना आधीच; बागायतदारांकडून प्रभावी उपाययोजना आवश्यक 

रत्नागिरी:- दरवर्षी मार्च ते एप्रिल या कालावधी उष्णतेच्या लाटांचा प्रभाव तयार होतो; मात्र यंदा त्या लवकर जाणवत आहेत. त्याचा परिणाम हापूसवर होत आहे. बदलत्या वातावरणानुसार बागायतदारांनी प्रभावी उपाययोजना केल्या पाहीजेत, असे कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. वैभव शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत मुख्यमंत्री निवासस्थानी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आंबा उत्पादक संघाने केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (ता. 23) रत्नागिरीत झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. वाढते तापमान, फुलकिडी, फळमाशी आणि तुडतुडा याचा आंबा लागवडीवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यावर डॉ. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, बावा साळवी यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.
यावेळी डॉ. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात उष्णतेची तिव्रता वाढली असून त्याचा हापूसवर परिणाम होत आहे. फळगळ टाळण्यासाठी फळांना पेपर बॅग लावणे, झाडांना वेळीच गरजेनुसार पाणी देणे व बुध्यांत मल्चिंग करणे असे प्रभावी उपाय केले पाहीजेत. तापमान किती आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी बागेत थर्मामीटर बसवावा. तापमान 35 अंश सेल्सिअसवर गेले की त्यावर उपाय कराव्यात. नोव्हेंबर, डिसेंबर ला येणार्‍या मोहोरातून उत्पादन मिळण्यासाठी 120 ते 130 दिवस लागतो; त्यानंतर येणार्‍या मोहोरातून 65 दिवसात फळ तयार होता. यावर्षी बदलत्या वातावरणामुळे कार्बोहायड्रेट तयार होण्याचा कालावधीच कमी राहिला. परिणामी आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात 15 टक्केच मोहोर आला. तर पुढील टप्प्यात 35 टक्के प्रमाण आहे. सध्या मोहोराचे सेटींग व्यवस्थित होईल. परंतु उष्मा लवकर जाणवू लागल्याने भविष्यात पारा दोन अंश अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळगळीची शक्यता आहे. त्यासाठी बागायतदारांनी आतापासुनच सज्ज रहावे.
आंब्यावरील किडींच्या प्रादुर्भावावर माहिती देताना डॉ. शिंदे म्हणाले, फुलकीडाचा प्रादुर्भाव समुद्रकिनारी बागांमध्ये दिसतो. फळ चिकुच्या आकारासारखा होते. यावर नियंत्रणासाठीची औषधे महाग आहेत. ती परवडत नाही. त्यामुळे बागायतदारांनी गरजेनुसार औषधे वापरावीत. झाडावरील फवारणीबरोबर जमिनीत किटकनाशके टाकल्यास अधिक प्रभाव पडतो. फळमाशी आणि तुडतुडा नियंत्रणासाठी कोकण कृषी विद्यापिठाने दिलेल्या वेळापत्रकानुसार बागायतदारांनी नियोजन केले पाहीजे.