रत्नागिरी:- रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अभिनेते भरत जाधव यांच्या ‘ तू तू मी मी ‘ नाट्यप्रयोगा दरम्यान नाट्यगृहातील वातानुकूलित कुचकामी ठरली. नाटकातील कलाकारांसह प्रेक्षक देखील घामाघूम झाल्याने अभिनेते भरत जाधव यांनी प्रेक्षकांची माफी मागत यापुढे रत्नागिरीत प्रयोग न करण्याचा पण केला.
शनिवारी तू तू मी मी या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगानंतर पुन्हा एकदा रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहातील असुविधांचा प्रश्न एैरणीवर आला आहे. हजारो रूपये भाडे आकारूनही वातानुकुलीत यंत्रणा आणि साऊंड सिस्टीम काम करत नसल्याने नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. साऊंड सिस्टिमचा प्रश्न अनेक वर्ष तसाच पडून आहे.
शनिवारी रात्री दहा वाजता स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात तू तू मी मी चा प्रयोग होता. प्रयोगाला पहिला फटका बसला तो बेकायदेशीर पार्किंगचा. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर वडापच्या गाड्या बेकायदेशीरपणे उभ्या असतात. शनिवारी रात्री वडापच्या गाड्यांमुळे नाटक कंपनीची नेपथ्याचे सामान घेऊन येणारी गाडी रस्त्यात अडकली. गाडी नाट्यगृहात यायला उशीर झाल्याने प्रयोगाला उशीर झाला. दहा वाजून गेले तरी प्रयोग सुरू न झाल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
नाट्यगृहाची साऊंड सिस्टिमने पुन्हा एकदा रंग दाखवला. तू तू मी मी चा प्रयोग सुरू होताच आवाज येत नसल्याने प्रेक्षक निराश झाले. आवाज कमी येत असल्याबाबत प्रेक्षकांमधून सूर उमटू लागले. साऊंड सिस्टिम बाबत काही प्रेक्षकांनी जाहिर नाराजी व्यक्त केली.
शनिवाराचा तू तू मी मी चा प्रयोग वातानुकुलीत नाट्यगृहात होता. 500, 400 आणि 300 रूपयांची तिकिटे काढून प्रेक्षक नाटक पहायला आले होते. प्रयोग सुरू होताच घामाच्या धारा वाहू लागल्या. नाटकातील प्रमुख अभिनेते भरत जाधव यांनाही नाट्यगृहातील कुचकामी वातानुकुलीत यंत्रणेचा फटका बसला. वातानुकुलीत यंत्रणा धड काम करत नसल्याने प्रेक्षक आणि कलाकार घामाघूम झाले. एसी सुरू आहे की नाही याबाबत काही प्रेक्षकांनी आवाजही उठवला. प्रचंड गर्मीमुळे अभिनेते भरत जाधव संतापले. नाट्यगृहाबद्दल नाराजी व्यक्त करताना असे नाट्यगृह असेल तर यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही असे त्यांनी संतापून सांगितले.
रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह हे आओ जाओ घर तुम्हारा सारखे कायम उघडे असते. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या शौचालयाचा वापर सार्वजनिक शौचालयासारखा होत आहे. रस्त्यावर वडापच्या गाड्या उभ्या असतात हे सर्वजण नाट्यगृहातील शौचालयाचा वापर करतात. तसेच आजूबाजूला येणारी- जाणारी मंडळी नाट्यगृहातील शौचालयाचा सार्वजनिक शौचालया सारखा वापर करतात.