यंदाचा हापुस हंगाम ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात 

रत्नागिरी:- नोव्हेंबर महिन्यात थंडीऐवजी कडाक्याचे उन आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती होती. त्याचा परिणाम पालवी जून होण्याच्या प्रक्रियेवर झाला असून पहिल्या टप्प्यात मुबलक मिळणार्‍या उत्पादनाला मुकणार की काय अशी भीती बागायतदारांमधून व्यक्त केली जात आहे; मात्र तज्ज्ञांनी, संशोधकांनी डिसेंबर महिन्यातील अखेरपर्यंत पालवीची स्थिती काय राहील यावरच हंगामातील चित्र अवलंबून असल्याचे स्पष्ट केले आहे.

सप्टेंबर महिन्यात परतणारा मोसमी पाऊस यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत पडतच होता. त्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही. पाठोपाठ नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित थंडीच पडली नाही. डिसेंबर सुरू होत आला तरीही अजुन थंडीचा पत्ता नाही. झाडांना आलेली पालवी अजूनही जून झालेली नाही. प्रक्रिया लांबणार असल्याने लवकर तयार होणारा आंबा, यंदा उशिरा तयार होईल. पालवी फुटलेली झाडे जून होणार. त्यानंतर मोहोर येणार तोपर्यंत उशिरा झालेला असेल. हे सर्व गणित पुढील तीन महिन्यातील हवामानावर अवलंबून राहणार आहे. मोहोर आल्यानंतर फळ परिपक्व होण्यासाठी दोन ते अडीच महिने लागतात. त्यासाठी एप्रिलचा अर्धा महिना उजाडेल अशी सध्याची परिस्थिती आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदा वातावरणातील बदलांचा परिणाम आंबा हंगामावर झालेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात ज्या पद्धतीने परतीच्या पवासाचा शेतीवर परिणाम झाला आहे. त्याच पद्धतीने कोकणातील हापूसला फटका बसू शकतो.

तामिळनाडू किनार्‍यावर धडकलेल्या निवार वादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसत आहे. तीन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पालवीवरील तुडतुड्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठीच्या फवारण्या बागायतदार करत आहेत. औषधांचा एक हात अधिक वापरावा लागत असल्याने खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत तज्ज्ञांकडून सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आंबा क्षेत्रात संशोधन करणार्‍यांनी पुढील आठवडाभर  वातावरण कसे राहील याचा अभ्यास करूनच पुढील निरीक्षणे नोंदवता येतील असे सांगितले आहे. डिसेंबर महिन्याअखेरीस हंगामाचे चित्र सांगता येतील. या कालावधीत मोहोर किती बाहेर आला, फ्लॉवरिंग किती झाले यावर हंगाम कसा राहील हे सांगू शकतो, असे कोकण कृषी विद्यापिठाचे संशोधक डॉ. हळदणकर यांनी सांगितले.