यंत्रणेतच समन्वयाचा अभाव; व्यापारी नाहक भरडला जातोय

सरसकट दुकाने सुरू करण्याची व्यापारी महासंघाची मागणी 

रत्नागिरी:- चौथ्या टप्प्यात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुरू ठेवायच्या दुकानांची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. असे असताना देखील मुभा असलेली दुकाने बंद ठेवण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यात समन्वय नसल्याचा फटका व्यापाऱ्यांना सहन कारावा लागत आहे. आधीच कर्जाच्या खाईत लोटलेल्या व्यापाऱ्यांना अधिक त्रास न देता सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी महासंघाकडून करण्यात आली आहे. 

दोन वर्षे संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. रत्नागिरी मधील व्यापाऱ्यांनी देखील ह्या लढ्यात सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गेले 2 महिने आपले व्यापार बंद ठेऊन व्यापारी आपले नुकसान सहन करत प्रशासनाला सहकार्य करत आहेत. कडक लॉकडाऊन नंतर देखील रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासन यशस्वी झाले नाही. 

परंतु आता व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करणे शक्य नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यात असून त्याप्रमाणे प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास सूट देण्यात आली आहे. सुमारे 70 टक्के दुकाने सुरू करण्यात आली असून देखील त्या 70 टक्के मधील काही दुकानांना दुकाने सुरू करण्यास पोलिस प्रशासन मज्जाव करत आहे. प्रशासनाला जाब विचारल्यास प्रशासनाकडून जी दुकाने सुरू करण्यास मंजुरी दिली आहे ती सुरू करावी असे सांगण्यात येते. परंतु प्रशासन पोलिस यंत्रणेला मात्र ह्याची कल्पना देण्यात येत नाही. त्यामुळे रोज सकाळी 9 वाजता बाजारपेठ उघडण्याच्या वेळी पोलिस चोराला पकडायला हजर असल्याप्रमाणे व्यापाऱ्यांना हटकतात व पोलिस स्थानकांमध्ये नेऊन गुन्हे दाखल केले जातात. 

आजदेखील सुमारे 30% पेक्षा अधिक व्यापारी आपली दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. परंतु आता त्यांना देखील नुकसान सहन करणे शक्य नाही. लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसून अनेक नागरिक आपली हॉस्पिटलचे बिल भागवण्यासाठी किंवा घरखर्च भागवण्यासाठी आपले दागिने विकत आहेत. त्यासाठी ज्वेलर्स ची दुकाने सुरू करणे गरजेचे आहे. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके लागतात, त्यासाठी स्टेशनरीची दुकाने सुरू करणे गरजेचे आहे. दूरध्वनी सेवा सुरू असल्याचे शासकीय आदेशामध्ये म्हटले असून मोबाईल विक्रेत्यांवर मात्र कारवाई केली जात आहे. शासनाने हा खेळखंडोबा थांबवावा. रस्त्यावर लोक फिरत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होत नाही मात्र केवळ 30% व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केल्यास कोरोनाचा प्रसार होतो, हे प्रशासनाचे अजब गणित कोणालाच समजणारे नाही. सायंकाळी 4 वाजता दुकाने बंद झाल्यावर देखील रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत रस्त्यावर लोक फिरत असतात. तेव्हा मात्र कोरोना पसरत नाही. आम्ही व्यापारी शासनाचे नियम पाळून केवळ सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपला व्यवसाय करत आहोत. आम्हाला देखील आमचे आणि आमच्या कर्मचारी वर्गाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही शासनाची वेळ पाळत आहोत. परंतु जे व्यापारी आजही आपली दुकाने बंद करून आहेत त्यांच्यासाठी मात्र आता प्रशासनाने दिलेल्या वेळेत सर्वानाच दुकाने सुरू करायला परवानगी द्यावी व तसे पोलीस यंत्रणेला देखील सूचित करावे, अशी मागणी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने केली आहे.