म्हाडाच्या पडीक भूखंड, घरांच्या विक्रीचे आव्हान

रत्नागिरी:- म्हाडाची 11 हजारांहून अधिक घरे आणि अनेक भूखंड विक्रीविना पडून आहेत. त्यांची एकत्रित किंमत सुमारे तीन हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार कोकण म्हाडाच्या पडून असलेल्या पाच हजार घरांचा विक्रीचे आव्हान कोकण मंडळ आणि खासगी संस्थेसमोर राहणार आहे.

म्हाडाच्या पडून असलेल्या या घरांसाठी, भूखंडांसाठी वारंवार सोडत काढण्यात आली. तसेच ही घरे प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट करण्यात आली. तरीही त्यांची विक्री होऊ शकली नाही. संबंधित मंडळ आता निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम, विपणन
क्षेत्रांतील संस्थेची नियुक्ती करणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून घर खरेदी करणार्‍यांना सुरुवातीला त्याच्या एकूण किमतीच्या 25 टक्के रक्कम भरावी लागणार असून, उर्वरित 75 टक्के रक्कम मासिक हप्त्यांनी भरण्याची मुभा असेल.
घरे आणि भूखंडांच्या विक्रीसाठी पाच पर्याय सूचवण्यात आले होते. त्यांपैकी खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. संस्थेला प्रत्येक सदनिकेच्या, भूखंडाच्या विक्री किमतीच्या 5 टक्के रक्कम मोबदला म्हणून दिला जाणार आहे. घरांच्या विक्रीसाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली.