राजापूर:- मोबाईल रजिस्ट्रेशन करावयाचे आहे सांगून ओटीपी घेत वृध्दाला 2 लाख 49 हजार 989 रुपयांचा गंडा घातल्याची घटना तालुक्यातील नाटे येथे घडली. याबाबतची फिर्याद सौदागर अंबाजी विचारे (61, रा. देवीहसोळ, राजापूर) यांनी नाटे पोलीस स्थानकात दिली. ही घटना 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1.45 ते 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदागर विचारे यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. समोरच्या व्यक्तीने एमटीएनएल ऑफिसमधून क्लार्क अरुण दास बोलत आहे. तुमच्या मोबाईलचे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे असे सांगून मोबाईलवर ओटीपी येईल तो आम्हाला कळवा असे सांगितले. त्यानुसार सौदागर यांनी तो ओटीपी सांगितला. समोरील व्यक्तीने सौदागर यांच्या अकाउंटवरुन धडाधड 2 लाख 49 हजार 989 रुपये ऑनलाईन काढून घेतले. आपल्या अकाउंटवरून पैसे गेल्याचे लक्षात आल्यावर सौदागर यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 (क), 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.