मोबाईलमुळे अंमली पदार्थ कारखान्याचा कट उघड

उत्तर प्रदेशात कारवाईनंतर लोटेचा पर्याय ; आंतरराष्ट्रीय कनेक्शन

रत्नागिरी:- उत्तर प्रदेशातील अंमली पदार्थांचा मोठा कारखाना लोटे (ता. खेड) औद्योगिक परिसरामध्ये उभारण्याचा मोठा कट ठाणे पोलिसांमुळे उघड झाला आहे. ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलेल्या सात संशयितांतील एका आरोपीच्या मोबाईलमुळे हा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यामुळे अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय टोळीशी जिल्ह्याचे काय कनेक्शन याचा तपास पोलिस करत आहेत.

मेफेड्रिन या अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी कारखाना सुरू करण्याच्या बेत असलेल्या नफीस पठाण (वय 33, रा. मुंब्रा) यांच्यासह सातजणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख ६८ हजारांच्या एमडी पावडरसह १४ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक टोळके परराज्यातून एमडी या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे अंमली पदार्थविरोधी पथकाने अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या जितेंद्र चव्हाण (वय 33, रा. कोलशेत, ठाणे) आणि सचिन चव्हाण उर्फ गया भाई (वय ३८, रा. कोलशेत रोड, ठाणे) या दोघांना सापळा रचून काही दिवसांपूर्वी अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनेश कोडमूर (वय़ ३७, रा. नवी मुंबई) यालाही अटक करण्यात आली. त्याने सात किलो एमडी पदार्थ सलाउद्दीन शेख उर्फ मामा याच्याकडून खरेदी केल्याचे तसेच शेख हा अभिषेक कुंतल उर्फ सरजी याचसाठी काम करत असल्याचे उघड केले. त्याच आधारे सलाउद्दीन शेख (वय ४१, रा. मुंब्रा) आणि अभिषेक कुंतल (वय ५४, रा. रायगड) यांना अटक करण्यात आली.
कुंतल हा हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील अन्य काही लोकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. उत्तर प्रदेशातील एमडी हे अंमली द्रव्य तयार करण्याचा कारखाना रेव्हिन्यू इंटेलिजन्सने बंद केला. त्यामुळे लोट (ता. खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हा कारखाना सुरू करण्याचा अभिषेक कुंतलचा प्लॅन होता. त्याचा मोबाईल जप्त केल्यामुळे हा कट उघडकीस आला.