रत्नागिरी:- तीन वर्षांपूर्वी बकऱ्या चरवण्यासाठी गेलेल्या मैथिली प्रविण गवाणकर ( रा. चिंचवाडी खेडशी , रत्नागिरी ) हिच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून झाला होता. या आरोपातून सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने संशयित तरुणाची आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
निलेश उर्फ उक्कु प्रभाकर नागवेकर ( ३५, रा . खेडशी भंडारवाडी , रत्नागिरी ) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे . त्याच्याविरोधात मैथीलीचे वडिल प्रविण सिताराम गवाणकर ( ४३ , रा . खेडशी भंडारवाडी , रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती . त्यानूसार , ९ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी मैथिली ही बकऱ्या चरवण्यासाठी खेडशी येथील मोडा जंगल परिसरात गेली होती . सायंकाळी ६ वाजता बकऱ्या घरी परतल्या होत्या परंतू मैथिली घरी न परतल्याने तिच्या आईने ही बाब प्रविण गवाणकर यांना सांगितली . त्यांनी मैथिलीच्या मोबाईलवर फोन केला परंतू ती फोन उचलत नव्हती . म्हणून त्यांनी जंगलात जाउन पाहिले असता त्यांना मैथिली कुठेही दिसून आली नाही.
याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांना चेहरा विद्रुप झालेल्या अवस्थेतील मैथिलीचा मृतदेह आढळून आला होता . याप्रकरणी तपास केल्यानंतर ग्रामीण पोलिसांना ज्यावेळी मैथिली जंगलात बकऱ्या चरवण्यासाठी गेली होती तेव्हा निलेशने तिची एक बकरी उचलून घेतली होती . त्यावेळी मैथिलीने ‘ तु आमच्या बकऱ्या चोरतोस काय ? बकरी सोड , नाहीतर मी गावात सर्वांना तू माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोस असे सांगेन ‘ , असे निलेशला सांगितले.आपली बदनामी होईल या भितीने निलेश तिथून निघून गेला होता . परंतू काहीवेळाने त्याने मैथिलीच्या पाठीमागून जाउन तिच्या डोक्यात दगड मारुन तिला ठार मारले होते असा त्याच्यावर आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता . हा खटला न्यायालयात सुरु होता . संशयित आरोपीतर्फे ॲड . मुदस्सर डिंगणकर यांनी ४ साक्षीदार तपासले . त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश एल . डी . बिले यांनी निलेशची आरोपातून निर्दोष मुक्तता केली.