रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी परिसरात माणसांवर हल्ले केल्यानंतर पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे. चरण्यासाठी गेलेल्या एका गायीला बिबट्याने फस्त केल्याने बिबट्याने पुन्हा एकदा वनविभागासमोर आव्हान उभे केले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतून बिबट्याला पकडण्यासाठी दुसर्यांदा आलेले पथक बिबट्याला पकडू न शकल्याने माघारी गेले आणि बिबट्याने पुन्हा आपला हिसका दाखवला. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मेर्वी खालची म्हादयेवाडी येथील अमोल अनंत मांडवकर यांच्या गायीवर हल्ला करून तिला ठार मारले. शुक्रवारी (ता. 2) दुपारी तीनच्या सुमारास घरापासून काही अंतरावर नेहमीप्रमाणे गुरे सोडण्यात आली होती. त्यानंतर ते कुटुंब कापणीच्या व झोडणीच्या कामात दंग होते. सोडलेल्या गुरांपैकी एक बैल घाबरलेल्या अवस्थेत घरी आला. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी काहीतरी घडले असावे, असा अंदाज बांधला. सायंकाळी पाचच्या सुमारास अन्य गुरांसोबत गेलेली गायही न आल्याने घरातील लोक गाय शोधायला गेले. त्यावेळी त्यांना एका झाळीमध्ये गाय मेलेल्या अवस्थेत दिसली. याबाबत तातडीने वनविभागाला कळविल्यानंतर त्यांनी त्या भागात पिंजरा बसवला. या पिंजर्यात बिबट्यासाठी ही मेलेली गाय ठेवण्यात आली आहे. तसेच येथून जवळच आणखी एक पिंजरा बसवला आहे.
या परिसरात वनविभागाची गस्त रस्त्यावर सुरू आहे. पण शुक्रवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आणि प्राण्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्या अद्याप पिंजरा व कॅमेर्यातही कैद होत नसल्याने वनविभाग हैराण झाला आहे. पावस परिसरात वनविभागाने जनजागृती सुरू केली आहे.









