रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी येथील सीताराम वीर याला दुर्वास पाटील व त्याच्या दोघा साथीदारांनी खंडाळा येथील सायली बारमध्ये मारहाण केली होती. त्यानंतर दुर्वासने सीतारामला ज्या रिक्षातून घरी पाठवले होते त्या रिक्षाचालकास शोधण्यात पौलिसांना यश आले आहे. या रिक्षाचालकाचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात आला असून मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा बाप दर्शन पाटील याने त्यावेळेस रिक्षाचे १५० रुपये भाडे दिल्याची माहिती समोर येत आहे.

दुर्वास पाटील याची प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम वीर हा कॉल व मेसेज करून त्रास देतो, असा संशय दुर्वास याला आला होता. सीताराम याला धडा शिकवायचा असा चंग दुर्वास याने बांधला होता.
२९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम हा दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये दारु पिण्यासाठी आला होता. यावेळी दुर्वास पाटील व त्याच्या दोघा सहकाऱ्यांनी सीतारामला बेदम मारहाण केली. यामध्ये सीताराम याचा मृत्यू झाला होता. या घटनेने घाबरलेल्या दुर्वास याने खंडाळा रिक्षा स्टँडवरून एका रिक्षाचालकाला बोलावून घेतले. सीताराम वीर हा बारमध्ये चक्कर आल्याने पडून जखमी झाला. त्याला घरी सोड असे रिक्षा चालकाला सांगितले. दुर्वासने सीतारामला रिक्षामध्ये भरले. तसेच त्याच्यासोबत एक माणूस पाठवून दिला. रिक्षा चालकाने सीताराम वीर याला त्याच्या कळझोंडी येथील घरी सोडले. घरी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सीतारामवर उपचार करण्यासाठी नातेवाईकांकडून डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले होते. यावेळी घरी आलेल्या डॉक्टरांनी सीताराम हा मृत असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी सीतारामच्या आकस्मिक मृत्यूची माहिती पोलिसांना न देता परस्पर अत्यंविधी उरकून घेतला होता.
रिक्षाचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सीताराम वीरला घरी सोडले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी दुर्वासचा बाप दर्शन याने रिक्षा चालकाला घरी बोलावून घेतले. तसेच कालच्या रिक्षाचे भाडे किती झाले, अशी त्याला विचारणा केली. त्यावेळी रिक्षाचालकाने त्याला रिक्षा भाडे १५० रुपये झाल्याचे सांगितले. त्यानुसार दर्शन पाटील याने रिक्षा चालकाला भाड्याचे पैसे दिले. यानंतर रिक्षाचालक त्याठिकाणाहून निघून आला होता. अशी माहिती आता समोर आली आहे.