मुहूर्त सापडला! वाशीतून हापूस अमेरिकेला रवाना

जपानवारीही लवकरच घडण्याची शक्यता

रत्नागिरी:- कोकणातील हापूससह अन्य आंब्याची या हंगामातील निर्यात सुरु झाली आहे. पणन मंडळाने वाशी येथील प्रक्रिया केंद्रातून केशर आणि बैगनपल्ली जपानला तर हापूस अमेरिकेला पाठवण्यात आला आहे. हापूसची जपानवारीही लवकरच सुरु होईल असे पणनकडून सांगण्यात आले.

पणन मंडळाने वाशी येथून 6.5 मेट्रीक टन हापुस, केशर व बैगनपल्ली आंबे अमेरिकाला निर्यात केले. आंब्यामधील कोयकिडा व किटकांचे निर्मुलन करण्याकरिता अमेरीका येथे आंबा निर्यातीपुर्वी विकीरण प्रक्रिया बंधनकारक आहे. वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर आंबा निर्यात करण्यात आला. ही प्रक्रिया करतांना अमेरीकेचे निरीक्षक एलीफिडो मारिन हे उपस्थित होते. रेनबो इंटरनॅशनल, गुरुकृपा कॉर्पोरेशन व श्रीजी मॅगोज या निर्यातदार कंपनीकडून कन्साइनमेंट पाठविण्यात आली. मॅगोनेटमुळे बहुतांश शेतकर्‍याचा माल त्यांच्या शेतावरुनच निर्यातदार खरेदी करतात आणि पर्यायाने शेतकर्‍याला चांगला दर प्राप्त होण्यास मदत होत आहे. तसेच पणन मंडळाने या हंगामातील आंब्याची जपानची पहिली कंन्साईनमेंट पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधेवरुन रवाना झाली. यामध्ये केशर व बैगनपल्ली असा एकुण 1.1 मे. टन आंबा मे. जयश्री एक्पोर्ट यांच्या माध्यमातुन जपान येथे निर्यात करण्यात आला. व्हेपर हीट ट्रिटमेंट (उष्णजल प्रक्रिया) करुन आंबा पाठविण्यात आला. 2020 व 2021 मध्ये कोविडमुळे जपान देशाचे निरीक्षक भारतात येऊ शकले नाहीत. गतवर्षीपासून जपानने त्यांचे निरीक्षक न पाठविता केंद्र शासनाच्या एनपीपीओ विभागाच्या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया करून, प्रक्रियेचे प्रमाणीकरण करुन आंबा आयातीस जपानने परवानगी दिली आहे, असे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दिपक शिंदे यांनी सांगितले. आंब्यावरील फळमाशीचा प्रादुर्भाव नष्ट होण्यासाठी व्ही.एच.टी. प्रक्रिये केली जाते. दरम्यान, या कन्साईनमेंटकरिता अपेडा, एनपीपीओ यांच्या सहकार्याने कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील आणि इतर अधिकार्‍यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

समुद्रामार्गे निर्यातीसाठी चर्चा सुरु

गतवर्षी अमेरीकेला समुद्रामार्गे आंबा निर्यात यशस्वीपणे प्रायोगिक तत्वावर करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात व्यावसाईकदृष्ट्या समुद्रमार्गे निर्यात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या संदर्भात निर्यातदारांशी पणनचे अधिकारी चर्चा करत आहेत. तसेच नवीन निर्यातदारांना अमेरीकेत निर्यातीच्या दृष्टीने प्रोत्साहीत करण्यात येत असून मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे श्री. दिपक शिंदे यांनी सांगितले.