मुलीबद्दल तक्रार केल्याच्या रागातून भावाच्या डोक्यात केला दांडक्याने प्रहार 

दापोली:- दापोली तालुक्यातील म्हाळुंगे देवघरेवाडी येथे मुलीबद्दल तक्रार केल्याचा राग आल्याने दारु पिवून आलेल्या बापाने तरुणावर दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भरत हरिभाऊ देवघरे ( म्हाळुंगे, दापोली ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबतची तक्रार किशोर हरिभाऊ देवघरे ( ४७, म्हाळुंगे , देवघरेवाडी, दापोली ) यांनी पोलीस स्थानकात दिली. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर देवघरे आणि भरत देवघरे ( मोठा भाऊ ) हे नात्याने भाऊ आहेत . किशोर यांनी भाऊ भरत यांना फोन करुन सांगितले की , तुझी मुलगी ही माझ्याबद्दल ( किशोर ) हायस्कूलमधील मुलांना नको ते सांगते. त्यानंतर भरत हा दुचाकी घेऊन किशोर यांच्या घरी गेला . यावेळी किशोर यानी भरत यांना तुझ्या मुलीला समजावून सांग असे सांगितले. मात्र दारु पिवून आलेल्या भरत याने मुलीबद्दल तक्रार केली याचा राग येवून किशोर यांच्या डोक्यात लाकडाचा दांडका घातला. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. दांडका मारल्याने किशोर हे जखमी झाले. त्यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली . त्यानुसार पोलिसांनी भरत देवघरे याच्यावर भादविकलम ३२४ , ३२३ ५०४ , ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .