देवरुख:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मुर्शी बस थांब्याजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात २९ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजून २० मिनिटांनी घडला. मात्र, या घटनेची नोंद तब्बल पाच दिवसांनी ०४ मे रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कोल्हापूरला जाण्यासाठी रत्नागिरी-कोल्हापूर हायवेवरील मुर्शी बस थांब्यावर बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्या रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेच्या उजव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून, डाव्या खांद्यालाही दुखापत झाली आहे. तसेच, त्यांना इतरही किरकोळ जखमा झाल्या आहेत.
अपघात घडल्यानंतर कारचालक तेथे न थांबता गाडी घेऊन पळून गेला, असे फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी देवरूख पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात कार आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. पाच दिवसांनंतर या अपघाताची नोंद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.