जयु भाटकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रत्नागिरी:- चरित्रकार पद्मश्री स्व.धनंजय कीर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला द्यावे अशी मागणी मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी सहाय्यक संचालक आणि माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मराठी साहित्यात ज्येष्ठ लेखक चरित्रकार पद्मश्री स्व.धनंजय कीर यांचे लेखन हे अपूर्व लेणं आहे. चरित्रकार धनंजय कीर यांचे जन्मगांव रत्नागिरी. शहरातील पाटीलवाडीत त्यांचं घर आहे. आजच्या आणि पुढच्या पिढीला या थोर आतंरराष्ट्रीय किर्तीच्या लेखकाचे स्मरण चिरंतन रहावे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला त्यांचे नाव द्यावे. या उपकेंद्राला पद्मश्री स्व.धनंजय कीर विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी,मुंबई विद्यापीठ असे नाव देण्याची मागणी जयु भाटकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. चरित्रकार धनंजय कीर यांनी अनेक थोर व्यक्तींची चरित्रे लिहिली आहेत. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले:आमच्या समाजक्रांतीचे जनक, लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहु महाराज :एक मूल्यमापन, स्वातंत्र्यवीर सावरकर, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर:मानस आणि तत्वविचार, महात्मा फुले समग्र वाड:मय, शेतकऱ्यांचा आसूड, कृष्णराव अर्जुन केळुसकर:आत्मचरित्र व चरित्र, लोकहितकर्ते बाळासाहेब बोले, श्री नामदेव चरित्र, काव्य आणि कार्य, राजर्षी शाहू छत्रपती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्रमय चरित्र, कृतज्ञ मी कृतार्थ मी हे आत्मचरित्र मराठीत प्रसिद्ध आहेत. इंग्रजीत वीर सावरकर, डॉ.आंबेडकर लाईफ़ ॲण्ड मिशन, लोकमान्य टिळक :फादर ऑफ़ इंडियन फ्रीडम स्ट्रगल, महात्मा ज्योतिराव फुले:फादर ऑफ़ इंडियन सोशल रिव्हॅल्युएशन, महात्मा गांधी आणि शाहु छत्रपती हि आत्मचरित्र प्रसिध्द आहेत. हिंदीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित प्रसिध्द आहे. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात चरित्रकार धनंजय कीर यांच्या ग्रंथसंपदेचे एक दालन उभारावे अशी जयु भाटकर यांची संकल्पना आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव द्यावे अशी मागणी करून सर्व संकल्पना त्यांच्या समोर मांडणार असल्याचे माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनी सांगितले.









