मुंबई येथून पळालेला मुलगा रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी:- मुंबई उल्हासनगर गुरुवारी पहाटे 4 वा. पळालेला अल्पवयीन मुलगा मंगला एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने जात असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केले.

अनुप यादव (12) असे त्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.गुरुवार 8 जून रोजी मुंबई विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बडे यांनी रत्नागिरी पोलिस नियंत्रण कक्ष येथे फोनव्दारे मुंबईतून एक अल्पवयीन मुलगा मंगला एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती दिली.त्यानुसार नियंत्रण कक्षाने तातडीने शहर पोलिस ठाणे आणि रत्नागिर रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली.शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल खापरे आणि गायकवाड यांनी हे दोघे तत्काळ रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे रवाना झाले.त्यांनी मंगला एक्सप्रेसमधून अनुप यादवला ताब्यात घेउन गुरुवारी दुपारी 12.40 वा.रत्नागिरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.त्यानंतर मुंबई विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बडे यांना याबाबत फोनव्दारे माहिती देण्यात आली.