खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे आज दुपारी 12.15 वाजता एका कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली, त्यामुळे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास मिळाला. वेळीच खबरदारी घेतली गेल्याने काही वेळातच भडकलेली आग आटोक्यात आली आणि अनर्थ टळला.
आज दुपारी 12.15 वाजता पीरलोटे येथील हॉटेल पार्वती नजीक एका चालत्या कोळसावाहू ट्रकच्या(क्र. MH06-ED-2997) केबिन मधून अचानक धूर येऊ लागला. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने ट्रक थांबवून ट्रक मधून उडी मारली. काही कळायच्या आत ट्रकच्या केबिनला आग लागली आणि महामार्गावर काहीवेळ गोंधळाची परिस्थितीती निर्माण झाली.
खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी व अन्य नागरीक यांनी वेळीच खबरदारी घेऊन आग विझवली आणि त्यामुळे अनर्थ टळला. या दुर्घटनेत ट्रकचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.









