मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी गरज भासल्यास ठेकेदारांना मुदतवाढ

रत्नागिरी:- कोरोनामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम थांबले होते. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे ठेकेदारांनाही नाही. त्यामुळे केंद्र शासनाने या कामांसाठी ठेकेदारांना गरज असल्यास सहा महिने मुदत वाढ दिली जावी असे आदेश राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाला दिले आहेत; मात्र अद्यापही एकाही ठेकेदाराकडून मुदतवाढीसाठी मागणी करण्यात आलेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. दहा टप्प्यात ही कामे सुरू असून याची जबाबदारी वेगवेगळ्या ठेकेदारांकडे दिली आहे. इंदापूर ते खेड पर्यंतच्या कामाला वेग आला आहे; परंतु त्या पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील कामे रखडलेली आहेत. पुढे राजापूर ते सिंधुदुर्गत बहुतांश रस्ता पूर्णत्वास येत आहे. केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी रस्ते मंत्रालयाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर कामे खोळंबली. सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडण्याची शक्यता असल्याने कामे बंद होती. कामच नसल्याने उपासमारीच्या भीतीने महामार्गाच्या कामांवरील मजूर परराज्यातील गावाकडे निघून गेले. परिणामी महामार्ग दिलेल्या मुदतीत पूर्ण होणे अशक्य आहे. जून महिन्यात या कामांना शिथिलता दिली असली तरीही त्याला वेग आलेला नव्हता. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने कामात व्यत्यय आला.
कोरोना आणि नैसर्गिक संकटामुळे ठेकेदारांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. यासाठी केंद्र शासनाने संबंधित ठेकेदारांना दिलासा दिला आहे. मुदत संपल्यानंतर पुढे सहा महिने ठेकेदारांना वाढ देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सवार्ंनाच जून 2021 पर्यंत मुदत दिली गेली आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना सहा महिने म्हणजेच डिसेंबर 2021 पर्यंत मुदत मिळू शकते. एवढा कालावधी मिळाला तर हा महामार्ग सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरवली ते वाकेड या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. त्यादृष्टीने संबंधित ठेकेदाराकडून पावले उचलण्यात आली आहेत.