रत्नागिरी:- मुंबईत एका महिलेचा खून करुन रत्नागिरीत आश्रय घेतलेल्या दोन संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही संशयित रत्नागिरीत बिनधास्त वावरत होते. या दोघांना ताब्यात घेताच आंबेशेत परिसरात खळबळ उडाली आहे.
फरजाना फिरोज (रा.मानखुर्द, मुंबई) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर सोनू सिंह (वय ५५) आणि त्याचा मुलगा अतीश सिंह ( २५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.
मानखुर्द पोलीसांचे पथक त्यांना घेऊन मुंबईला रवाना झाले आहे. खुनाची ही घटना मुंबईतील मानखुर्द इंदिरानगरमध्ये शनिवारी संध्याकाळी 6.30 वा.सुमारास घडली होती. दोन कुटुंबांतील महिलांमध्ये आधी भांडण झाली होती. त्यात आधी मारहाण झाली. या दरम्यान एका महिलेच्या पती आणि मुलाने गोळीबार केला. ज्यात फरजना फिरोज हिच्या छातीत गोळी लागली. यानंतर महिलेला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
त्यानंतर मानखुर्द पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. गोळया झाडून हत्या नेमकी कोणी केली? हे स्पष्ट होत नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर सोनू सिंह त्याचा मुलगा अतीश सिंह या दोघांनी हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.
सोनू सिंह, मुलगा अतीश सिंह यांनी हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु केले होता. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहिल्यानंतर ते दोघे रत्नागिरीतील आंबेशेत येथे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मानखुर्द पोलीसांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली होती.