रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी हाती घेतलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६ मध्ये राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत आतापर्यंत १७ गुन्हे उघडकीस आणले असून, २७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ६ लाख ६४ हजार ५९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२५ मे २०२५ पासून सुरू झालेल्या ‘मिशन फिनिक्स’ उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ गुन्हेगारांवर कारवाई करणे हा नसून, अमली पदार्थमुक्त रत्नागिरी घडवणे हा आहे. २०२६ सालातील कामगिरीवर नजर टाकल्यास या वर्षात एकूण गुन्हे १७ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सेवनाचे गुन्हे ८, अमली पदार्थ बाळगल्याचे गुन्हे ९ आहेत तर या गुन्ह्यांमध्ये अटक केलेले आरोपी २७ आहेत. या गुन्ह्यांमध्ये जप्त मुद्देमाल ६,६४,५९३ रुपये (ब्राऊन हेरॉईन, गांजा व इतर अमली पदार्थ) आहे.
अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही छापेमारी केली. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करून अमली पदार्थांची पुरवठा साखळी तोडण्यावर भर देण्यात आला आहे.
अमली पदार्थांच्या विरोधात ‘शून्य सहनशीलता’ हे धोरण अवलंबत पोलीस प्रशासनाने यापुढेही कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यास मोठी मदत होत असून, सामाजिक सुरक्षिततेसाठी पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.








