मिऱ्या येथे मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीस

रत्नागिरी:-  शहरालगतच्या मिऱ्या येथे मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २७ डिसेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ या कालावधीत घडली. एकूण ८० हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या असल्याचे शहर पोलिसात दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरी करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महेंद्र कृष्णा साळवी (४२) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महेंद्र साळवी हे मिऱ्या येथील मोबाईल टॉवरच्या देखरेखीचे काम करतात. या टॉवरच्या तळाशी पत्र्याची बंदीस्त कैबिन असून त्यामध्ये बॅटऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. २७ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत चोरट्याने पत्र्याच्या कैबिनचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच आतील बॅटऱ्या चोरुन नेल्या, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय

संहिता कायदा कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील . तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे,