मिऱ्या बंधाऱ्यावरील धोकादायक ठिकाणी प्राधान्याने दुरुस्ती

रत्नागिरी:-मिऱ्या गावाच्या सुरक्षेच्या दृष्टाने धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर असून काही प्रमाणात त्याचे काम झाले आहे. मात्र पावसाळा तोंडावर असल्याने साडेतीन किमी बंधाऱ्यामधील ४ डेंजर स्पॉटच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पत्तन विभागाने या चार भागांच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. त्यामुळे मिऱ्यावासीयांना यंदाच्या पावसाळ्यात धोक्याखाली राहावे लागणार नाही. या बंधाऱ्याच्या कामातूनच ही दुरुस्ती होणार आहे.

भगदाड पडलेल्या भागात बंधाऱ्यासाठी आणलेले दगड तात्पुरते वापरुन पुन्हा तेच दगड पक्क्या बंधाऱ्याच्या कामाला वापरता येणार आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष लक्ष घातल्याने मिऱ्याच्या साडेतीन किमीच्या बंधाऱ्याला १८९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या प्रश्न ऐरणीवर येतो. उधाणाच्या भरतीमुळे वारंवार या बंधाऱ्याची प्रचंड धूप होते. अजस्र लाटा बंधारा गिळंकृत करून मानवी वस्तीमध्ये समुद्राचे पाणी शिरले आहे. यामुळे नागरिक भयभीत होऊन पावसाळ्यात त्यांना रात्र जागून काढावी लागते. आतापर्यंत बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. सुमारे साडेतीन किमीच्या या बंधाऱ्याचे कायमस्वरुपी पक्क्या बंधाऱ्यात रुपांतर व्हावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे आंदोलने केली, मोर्चे काढले, पोलिस केसेस झेलल्या. तरीही बंधाऱ्याचा प्रश्न मार्ग लागला नाही.

आता पुण्याच्या एजन्सीकडून त्याचा सर्व्हे झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या बंधाऱ्याच्या कामाचा आरंभ करण्यात आला. आतापर्यंत ९५ मीटर काम झाल्याचे पत्तन विभागाने सांगितले. मात्र तोंडावर पावसाळा आहे. बंधाऱ्याचे काम पुर्ण व्ह्यायला अजून काही वर्षे जाणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात उधाणाच्या मोठ्या भरत्या आहेत. मिऱ्यावासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पत्तन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा बंधाऱ्याची पाहणी केली. चार स्पॉट धोकादायक असून उधाणामध्ये भगदाड पडून वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चार ठिकाणी दुरुस्तीला पत्तन विभागाने प्राधान्य दिले आहे.