मिऱ्यावरील बसरा जहाज निघणार भंगारात

रत्नागिरी:- तब्बल पाच वर्षे खडकात अडकून राहिलेले आणि ‘रीलस्टार’ म्हणून प्रसिद्ध झालेले ‘बसरा स्टार’ हे जहाज अखेर भंगारात काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. सोमवार, २ जून रोजी लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे या जहाजाचे दोन तुकडे झाले होते. आता हे जहाज कटिंग करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, मिऱ्या किनाऱ्यावर प्रतीक्षेत असलेल्या महत्त्वाच्या बंधारा प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यामुळे ३ जून २०२० रोजी हे जहाज भरकटले आणि मिऱ्या किनाऱ्यावरील खडकात अडकले होते. या जहाजाला काढण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. सुरुवातीला सुमारे ३५ कोटी रुपये किमतीचे असलेले हे जहाज खाऱ्या पाण्याचा सततचा मारा आणि दुर्लक्षामुळे सडले. त्यामुळे आता ते केवळ दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढले जात आहे.

एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरीटाइम बोर्डाची कन्सल्टंट म्हणून हे जहाज बाहेर काढण्याचे काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे जहाज अधिकृतपणे भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या जहाजाचे मोठे तुकडे झाल्यामुळे आणि आता ते कटिंग करून काढले जात असल्याने, जहाज अडकल्यामुळे रखडलेल्या मिऱ्या किनाऱ्यावरील अनेक वर्षांपासूनच्या बंधारा प्रकल्पाला गती मिळणार आहे.