रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील साईभूमी नगर येथील एका बिल्डिंगमध्ये शुक्रवारी सकाळी 9.30 वा.सुमारास तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
साहिल विनायक मोरे (24, रा. अलावा मिर्या, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल एमआयडीसी येथील एका कार शोरुममध्ये कामाला होता. सध्या तो अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षणही घेत होता. साहिलचे एका फायनान्स कंपनीतील मुलीशी प्रेम संबंध होते. साहिलची आई जेटीवर मच्छि विक्रीचा व्यवसाय करते. शुक्रवारी सकाळीही त्याने आईला जेटीवर सोडल्यानंतर तो आपल्या प्रेयसिला भेटण्यासाठी साईभूमी नगर येथील प्रेयसीच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. परंतू त्या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी भांडण झालेले होते. त्यामुळे ते एकमेकांना भेटायचे पण फारसे बोलत नव्हते. दरम्यान,साहिलच्या प्रेयसीचे लग्न ठरल्यानंतर तिने साहिलला भेटणे सोडायला सांगितले. परंतू शुक्रवारी सकाळी साहिल तिला भेटण्यासाठी साईभूमी नगर येथील तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. काही वेळाने साहिलच्या प्रेयसीने मी कामावर जात असून तू फ्लॅटचा दरवाजा बंद करुन खाली ये असे त्याला सांगितले. परंतू 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतरही साहिल बिल्डिंगच्या खाली न आल्याने तिने साहिलला फोन केला. परंतू साहिल फोन उचलत नसल्याने तिने फ्ॅलटवर जाउन पाहिले असता तिला साहिल गळ्याला मोठा बेल्ट लावून सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
साहिलला त्या अवस्थेत पाहून त्याच्या प्रेयसीने कात्रीने तो बेल्ट कापून साहिलला शेजार्यांच्या मदतीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी साहिलला तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजणार आहे.