रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे येथील कोकण रेल्वे कॉलनीतील नर्मदा अपार्टमेंटमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना १ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी चंदन चंद्रकांत जगताप (वय २४, रा. नर्मदा अपार्टमेंट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुभम उत्तम जगताप (२१), उत्तम फकिरा जगताप (६२) आणि दोन अज्ञात महिला (सर्व रा. कारवांचीवाडी) यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदन जगताप हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरी असताना आरोपी क्रमांक १ ते ४ हे पुर्वीच्या वादातून बोलण्यासाठी आले आणि मोठ्या आवाजात बोलू लागले. त्यामुळे फिर्यादी यांनी सर्वांना इमारतीच्या खाली बोलण्यासाठी बोलावले. खाली आल्यावर फिर्यादी यांनी आरोपी क्रमांक १ शुभम याला ‘मी तुमचे काय केले?’ असे विचारले. यावर शुभमने फिर्यादीला त्याचे मोबाईलमधील रेकॉर्डिंग ऐकण्यास सांगितले आणि त्याच्या बहिणीला शिवीगाळ का केली, असा जाब विचारला.
यावेळी आरोपी उत्तम फकिरा जगताप आणि दोन महिलांनी चंदन जगताप याला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणाचा व्हिडिओ फिर्यादी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असताना आरोपी शुभमने मागून येऊन फिर्यादीला हाताने मारले आणि नखांनी गळ्यावर ओरबाडले. तसेच, आरोपी उत्तम फकिरा जगताप आणि दोन महिलांनी चंदन याला मागून पकडून खाली पाडले आणि आरोपी क्रमांक १ शुभमने चाकूने डोक्यावर वार करून त्याला जखमी केले. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून नुकसान झाले.
या घटनेनंतर फिर्यादी चंदन जगताप यांनी ०२ मे २०२५ रोजी मध्यरात्री ०.३९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३२४(४) आणि ३४(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.









