मिरजोळे आदर्शनगर रस्त्यावर रिक्षाची दुचाकीला धडक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव बाजारपेठ-मिरजोळे आदर्शनगर रस्त्यावर रिक्षाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वार जखमी झाला. शहर पोलिस ठाण्यात संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष दिलीप शिवगण (३६) असे संशयिताचे रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना ९ डिसेंबर २०२४ रात्री पावणे नऊच्या सुमारास कुवारबाव बाजारपेठ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रिक्षा (क्र. एमएच-०८ ए क्यू ५०१३) घेऊन कुवारबावहून आदर्शनगरकडे जात होते. याच वेळी दुचाकी (क्र. एमएच-०८ एडी ५४०६) कुवारबाव बाजार पेठे येथे आले असता संशयित रिक्षा चालकाने रिक्षा निष्काळजीपणे चालवून तसेच वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करुन अचानक आदर्शनगर रस्त्याकडे रिक्षा उजव्या बाजूला वळविली. यामुळे रिक्षा आणि दुचाकी याच्यात अपघात झाला. यामध्ये दुचाकी स्वार अभिषेक इदडप्पा तलवार जखमी झाले. रिक्षा व दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.