मिरकरवाड्यातील नौकेला मिळाला बंपर सरंगा

रत्नागिरी:- शहराजवळील मिरकरवाडा बंदरातील एका मच्छीमारी नौकेला बंपर सरगा मिळाला. वीस लाखाहून अधिक किंमतीचा मासा एकाच मच्छीमाराला मिळण्याची महिन्याभरातील पहिलीच वेळ असल्याची चर्चा सुरु होती. बदलत्या प्रवाहामुळे एकाच ठिकाणी ही मासळी मिळाल्याचा अंदाज मच्छीमारांकडून वर्तविली जात आहे.

नैसर्गिक संकटांमुळे यंदाचा मच्छीमारी हंगाम अडचणीत आला आहे. 31 डिसेंबरपासून पर्ससिननेट बंदीला सुरवात होणार आहे. गेले काही दिवस मतलई वारे वाहत असून थंडीचा कडाकाही वाढलेला आहे. वेगवान वार्‍यामुळे पाण्यातील प्रवाह पुढे सरकत आहेत. परिणामी मासेही रत्नागिरीच्या किनारी भागातून पुढे श्रीवर्धनच्या दिशेने सरकु लागले आहेत. जयगड किनारपट्टीपासून सुमारे 28 वाव खोल समुद्रात मिरकरवाडा येथील एका मच्छीमारी नौकेला सुमारे 6 टन बंपर सरगा मिळाला. सध्या सरंग्याला बाजारात 350 ते 400 रुपये किलो दर मिळत आहे. महिन्याभरापुर्वी जयगड पट्ट्यातच एका मच्छीमाराला बंपर मासळी मिळालेली होती. प्रवाहाबरोबर मासळी पुढे सरकत असल्यामुळे त्याचा फायदा या मच्छीमाराला झाल्याचा अंदाज आहे. परप्रांतीय नौकांचा धुडगूस सुरु असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या हाती काहीच लागत नाही. त्यामध्ये बंपर सरगा मिळाल्याने संबंधित मच्छीमार लखपती झाल्याची चर्चा मिरकरवाड्यात सुरु आहे.