मिरकरवाडा येथे घरफोडी करुन ३ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथे घरफोडी करुन ३ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळविणाऱ्या अज्ञात संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) रात्री एक ते सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या त्यांचा भाऊ नाजीम हसनमियॉ मजगावकर (रा. खडप मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) यांच्या घरी झोपायला गेल्या होत्या. त्या मुदतीत कोणीतरी अज्ञाताने फिर्यादी यांच्या घराचा मुख्य दरवाजाचे व खोलीच्या दरवाजाचे कुलुप कोणत्यातरी कठीण हत्याराने तोडून घरात प्रवेश करुन लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १५ हजार ग्रॅम वजनाचे मोठे सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपयांचे ५ ग्रॅम वजनाचे छोटे सोन्याचे मंगळसुत्र तसेच १० हजाराची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ३ लाख २५ हजार रोख रक्कम असा ३ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने पळविला. या प्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.