मिरकरवाडा येथून अडीच किलो गांजा जप्त 

रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  मिरकरवाडा येथून 40 हजार 740 रुपये किमतीचा 2 किलो 37 ग्रॅम गांजा पकडला. या प्रकरणी एका अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 11 जून 2021 रोजी रत्नागिरी शहर समुद्र किनारी परीसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अंमलदार गस्त करीत असता, रत्नागिरी मिरकरवाडा जुनी पोलीस चौकीसमोर रोडवर त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. यावेळी पोलिसांनी धाड टाकली असता मोहंमद ताहीर इब्राहीम मस्तान हा अट्टल गुन्हेगार तिथे दिसून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 40 हजार 740 किमतीचा 2 किलो 37 ग्रॅम गांजा, 4,800 रुपयांचे अन्य साहित्य असे एकूण 45,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केेला.

या प्रकरणी पोलीस हवालदार बाळू पालकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन ८ (क), २० (ब), २९ एन.डी.पी.एस ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्ह्यांत मोहंमद ताहीर इब्राहीम मस्तान (वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे.

सदर कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग यांनी अभिनंदन केले. सदर कामगिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोउपनि श्री विकास चव्हाण, पोह. सुभाष भागणे, मिलींद कदम, शांताराम झोरे, बाळू पालकर, अरुण चाळके, प्रशांत बोरकर, पोना. अमोल भोसले, रमीज शेख यांनी सहभाग घेतला .