रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरकरवाडा मच्छीमार बंदरावर बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी डिझेलचे टँकर येत आहेत. त्यामुळे बंदरावर ज्या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे डिझेल पंप आहेत त्यांचे संस्थाचालक संतप्त झाले आहेत. बंदरांवर नौकांच्या जवळ जाऊन टँकरमधून थेट डिझेल विक्री होत असल्याने सागरी सुरक्षेशी खेळ होत असल्याचे महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ही डिझेल विक्री बंद न झाल्यास मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा रत्नदुर्ग मच्छीमार सहकारी सोसायटीचे दादा सुर्वे यांनी दिला आहे.
मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे डिझेलपंप मिरकवाडा बंदरावर मोठ्या संख्येने आहेत. अशा संस्थांमध्ये सदस्य असलेल्या मच्छीमार नौकांना डिझेल पुरवठा केला जातो. या संस्थांचा डिझेल कोटा आणि परतावा बंद झाल्यानंतर संस्थांच्या डिझेल पंपांवर येणारे ग्राहक कमी झाले. ही संधी साधून मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाची कोणतीही परवानगी नसताना बाहेरच्या पेट्रोलपंप चालकांचे डिझेल टँकर बंदरावर येऊन डिझेल विक्री करू लागले. एका लिटरमागे 1 रु. चे कमिशन देण्याचे आमिष दाखवून ही डिझेलविक्री सकाळी, दिवसा,रात्री सुरु होती. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त, मिरकरवाडा बंदर प्राधिकरण यांच्याकडे तक्रार करण्यात येऊनही कोणतीच दखल घेतली गेली नाही, असे मच्छीमार विकास संघाचे अध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी सांगितले.
मिरकरवाडा बंदरावर रत्नदुर्ग, चंडिका, कर्ला, भाट्ये, आदर्श, कोकण, भगवती, राजीवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थांचे डिझेलपंप आहेत. या संस्थांमध्ये सदस्य असणार्या नौकांना संस्थेच्या पंपावरून डिझेल दिले जाते. आता अशा सहकारी संस्थांना डिझेल कोटा आणि नौकांना परतावा देण्याचे निर्देश नुकतेच शासनाकडून सहायक मत्स्य व्यवसाय विभागाला प्राप्त झाले आहेत. मात्र, बाहेरून येणार्या डिझेल टँकरवाल्यांकडून एका लिटरमागे 1 रु. चे कमिशन दिले जात असल्याने सहकारी संस्थांच्या डिझेलविक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर टँकरद्वारे होणारी थेट डिझेल विक्री बंद न झाल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा रत्नदुर्ग सहकारी संस्थेचे पदाधिकारी दादा सुर्वे यांनी दिला आहे.
डिझेलच्या एका लिटरला 1 रु. 80 पैशाचा नफा मिळतो. अशावेळी टँकरधारकाला एका लिटरमागे 1 रु. कमिशन कसे परवडू शकते? त्यामुळे या डिझेल विक्रीमध्ये काहीतरी गडबड असल्याची शक्यता आहे, असे मच्छीमार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी सांगितले. या प्रकरणी स्थानिक शासकीय यंत्रणेने लक्ष न दिल्यास केंद्रशासन आणि राज्यशासनाने तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.