मिरकरवाडा परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई; प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत: सोहेल साखरकर

रत्नागिरी:- मिरकरवाडा परिसरात पाण्याची प्रचंड समस्या निर्माण झाली आहे. एक दिवस आड पाणी करून देखील पाण्याच्या टाकीची लेवल होत नाहीय. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका इथल्या नागरिकांना सहन करावा लागत असून अशीच परिस्थिती राहिल्यास इथल्या नागरिकांना घेऊन नगर परिषदेत ठिय्या देऊ असा इशारा माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांनी दिला आहे.

मिरकरवाडा भाग पाण्याच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित ठेवण्यात आल्याचा आरोप साखरकर यांनी केला आहे. पाणी योजनेचे काम देखील मिरकरवाडा भागात कासवगतीने पूर्ण करण्यात आले. यासाठी शंभरवेळा नगर परिषद प्रशासनाला जाग आणून द्यावी लागली. आता पुन्हा मिरकरवाडा येथे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

शहरात एक दिवस आड पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक दिवस आड पाणी सोडले जात असल्याने पाण्याच्या टाकीची लेवल होणे आवश्यक असताना आजही टाकीची लेवल नाही अशी उत्तरे पाण्याच्या टाकीवरील कर्मचारी देत आहेत. या कर्मचाऱ्यांवर नगर परिषदेतील पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंकुश नाही. हे कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. मिरकरवाडा भागात प्रत्येक नळाला येणारे पाणी फार कमी प्रमाणात आहे. नगर परिषद प्रशासनाचे नियोजन नसल्याने मिरकरवाडा भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास नागरिकांसह नगर परिषदेवर धडक देऊ असा इशारा माजी नगर सेवक सोहेल साखरकर यांनी दिला आहे.