दापोली:- तालुक्यातील कोळथरे मोहल्ला येथे विशाल शशिकांत मयेकर याच्या खून प्रकरणी दाभोळ सागरी पोलिसांनी शशीभूषण सनकुळकर व मनोज आरेकर या त्याच्या दोन मित्रांना अटक केली. त्यांना दापोली येथील न्यायालयात हजर केली असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
विशाल मयेकर हा रक्ताने माखलेला मृत अवस्थेत 2 दिवसांपूर्वी तालुक्यातील कोळथरे मोहल्ला येथे सापडला होता. या घटनेबाबत मृताचा भाऊ अमित शशिकांत मयेकर यांनी फिर्याद दिली होती. त्या बाबत पोलीसांनी चौकशी केली असता 17 मे रोजी रात्री शशीभूषण शांताराम सनकुळकर (45, रा. कोळथरे), मनोज कमलाकर आरेकर (54, रा. कोळथरे) व मृत विशाल मयेकर हे तिघे मित्र त्या रात्री एकत्र दारू पिऊन मनोज कमलाकर आरेकर याचे घरी जाऊन पुन्हा दारू पीत बसले.
त्यावेळी शशीभूषण सनकुळकर हा मृत विशाल मयेकर यास बाहेर जाऊ, असे म्हणत होता. परंतु विशाल मयेकर नकार देत असल्यामुळे भूषणने चिडून त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली व तो लाकडी दांडके सोबत घेऊन बाहेर निघून गेला. काही वेळाने विशाल मयेकर हा जखमी अवस्थेत निमूर्डेवाडी पंचनदीकडे जात असताना कोळथरे मोहल्ला येथे आल्यावर जास्त रक्तस्त्राव होऊन जागीच मृत झाला. त्याच्या सोबत असलेले मित्र मनोज आरेकर व शशीभूषण सनकुळकर हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. 20 मे रोजी त्यांना सापळा रचून तालुक्यातील बुरोंडी येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती दाभोळ पोलिसांनी दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.