रत्नागिरी:- पत्नीला तिच्या माहेरी भेटण्यास जात असल्याच्या कारणातून तीन अज्ञातांनी पतीला लाथाबुकक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवार 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास एमआयडीसी रेल्वे ब्रिजच्या अलीकडे असलेल्या वर्कशॉपमध्ये घडली.
याबाबत शादाब शौकत गोलंदाज (34, रा. कोकणनगर, रत्नागिरी) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी शादाबचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने ती माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी वरचेवर तिच्या माहेरी जात होता. याचा राग मनात धरुन तीन अज्ञातांनी बुधवारी सायंकाळी शादाबच्या वर्कशॉपमध्ये जाउन त्याला ‘तू दिलीप पावसकर यांना ओळखतोस काय’ असे विचारले. तेव्हा शादाबने ते माझे सासरे आहेत असे त्यांना सांगितले. त्यावर संशयितांनी शादाबला ‘तुमचा आता संबंध संपलेला असून तू त्याच्या मुलीला का त्रास देतोस?’ असे बोलून लाथा-बुकक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यातील एकाने वर्कशॉपमधीलच एक पाईप घेउन फिर्यादीच्या डाव्या कुशीवर मारुन दुखापत करुन शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.