मासेमारी करून पळून जाणाऱ्या संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पावस:- पावस-रनपार येथे मासेमारी करून पळून जाणाऱ्या मलपी कर्नाटकातील मासेमारी नौकेचा गस्ती नौकेने पाठलाग करून पकडले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

देवेंद्र तिमाप्पा मोगर (वय ३७, रा. भटकळ, कर्नाटक), संतोष कृष्णा दामोदलेकर (कर्नाटक), लोकेश महाबळेश्वर मोगर (भटकळ, कर्नाटक), मोहन मंजुनाथ मोगर (कर्नाटक), विनोद मंजू मोगर (कर्नाटक), चिकाटी रामाराव (आंध्र प्रदेश), वसंत चला मोगर (कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ८) रात्री सव्वाबाराच्या सुमारास रनपार पावस समुद्रामध्ये ५ नॉटिकल मैल अंतरावर घडली. सहाय्यक आयुक्त चिन्मय संजय जोशी (वय २९) यांनी याबाबत तक्रार दिली. बुधवारी कर्नाटक राज्यातील मलपी हायस्पीड मासेमारी नौका अनधिकृत मासेमारी करताना गोळप समुद्रात दिसून आली होती. तिला पकडण्यासाठी स्पीडबोट गेली असता संशयित सातजणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी सहाय्यक आयुक्त जोशी यांनी तक्रार दिली. शुक्रवारी संशयितांना अटक केली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर आज त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

+