सुदेश मयेकर; नवा वाद, तत्काळ कार्यवाई करण्याची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेचे माळनाका येथील हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे शहरात जे बॅनर लावण्यात आले आहेत त्यावर कुठेही पालिकेचे नाव नाही तसेच प्रवेशद्वारावरही पालिकेचा उल्लेख नाही. पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या ही बाब का लक्षात आलेली नाही की जाणूनबुजून रत्नागिरी नगर पालिकेचा नामोउल्लेख टाळण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेऊन पालिकेच्या नावाबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुदेश मयेकर यांनी निवेदनाद्वारे केली.
पालिकेच्या माळनाका येथील आरक्षित जागेमध्ये पालिकेने शासनाच्या विविध योजनांमधील अनुदानामधून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण उभारले आहे. तारांगणाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडला. पालिकेने या तारांगणाची प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने शहारामध्ये ठिकठिकाणी मोठे बॅनर्स लावले आहेत; परंतु त्या सर्व बॅनर्सचे अवलोकन करता त्या बॅनर्सवर रत्नागिरी पालिकेच्या नावाचा उल्लेख केल्याचे कुठेही दिसत नाही. तारांगणाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा रत्नागिरी पालिकेच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. तसे पुरावे त्यांनी दिले आहेत. तारंगणाच्या बॅनर्सवर तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पालिकेच्या नावाचा उल्लेख नाही. या ठिकाणी पालिकेकडून प्रत्येक शोसाठी तिकिटे काढली जात असून तारांगणावर पालिकेचे कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत. मात्र आजपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास कसे आले नाही, याचेच आश्चर्य वाटते? की जाणूनबुजून रत्नागिरी पालिकेचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे. या गंभीर प्रकारची तत्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे सुदेश मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.