रत्नागिरी:- पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट आल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील मालगुंड समुद्र किनारी घडली. मालगुंड समुद्र किनाऱ्यावर चारचाकी नेण्याचा प्रयत्न पर्यटकांच्या चांगलाच अंगलट आला. मालगुंड समुद्र किनारी वाळूत चारचाकी गाडी फसली आणि गाडी बाहेर काढताना पुरती दमछाक उडाली.
रत्नागिरीत समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या अतिउत्साहीपणाचा फटका बसल्याच्या अनेक घटना ताज्या असताना गुरुवारी याचा पुन्हा अनुभव आला. सांगली येथून गणपतीपुळे येथे चारचाकी वाहनातून पर्यटक आले होते. परिसर फिरण्यासाठी हे पर्यटक मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर पोचले. या पर्यटकांनी किनाऱ्यावर वाळूत गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि गाडी वाळूत फसली. बघता बघता गाडी वाळूत फसली. गाडी एक फुटापर्यंत वाळूत फसली आणि अखेर स्थानिकांनी प्रयत्न करून गाडी बाहेर काढली.