रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड तळेपाटवाडी येथे पैशाच्या वादातून एकावर कोयतीने वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मालगुंड परिसरात खळबळ उडाली आहे. सदानंद गोपीनाथ पाटील (42, भंडारपुळे, मालगुंड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची तक्रार जयगड पोलीस स्थानकात दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला तासाभरातच ताब्यात घेतले आहे. बाबू धोत्रे (38, तळेपाट, मालगुंड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, संशयित आरोपी बाबू धोत्रे याला संदेश महाकाळ (भंडारवाडा, मालगुंड) यांच्या आईने व्यवसायासाठी 30 हजार रुपये दिले होते. मात्र 5 वर्षे झाली तरी बाबू धोत्रे याने उसणे घेतलेले पैसे परत केले नाहीत. पैशांची गरज असल्यामुळे संदेश महाकाळ हे सोमवार 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पैसे मागण्यासाठी बाबू धोत्रे याच्याकडे गेले होते. जाताना त्यांनी आपल्या सोबत नातेवाईक सदानंद पाटील (भंडारपुळे, मालगुंड) यांना घेतले होते. धोत्रे याच्या घरी गेल्यानंतर संदेश आणि सदानंद यांनी पैसे कधी अशी विचारणा केली. धोत्रे हा वारंवार ‘पैसे देणार नाही काय करायचे ते करा’ असे सांगत होता. यावेळी धोत्रे आणि संदेश यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघात तुफान मारहाण सुरू झाली. यावेळी बाबू म्हात्रे याने बाजूची काठी उचलून संदेश याला मारहाण करायला सुरुवात केली. परंतु संदेश याने ती काठी धरून ठेवली. यादरम्यान सदानंद पाटील हे भांडण सोडवण्यासाठी गेले. यावेळी धोत्रे याने बाजूला पडलेली कोयती उचलली आणि संदेश याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही संदेश याने आपली मान खाली करून तो वार चुकवला. मात्र संदेश याच्या मागे असलेल्या सदानंद यांच्या कपाळावर कोयतीचा जोरदार वार झाला. सदानंद यांच्या डोक्यात कोयतीची खोलवर जखम झाली. रक्ताची चिळकांडी उडाली. भळभळा रक्त वाहू लागले. सदानंद पाटील हे जागीच कोसळले. यावेळी संदेश याने धोत्रे याला जोरदार ढकलून दिले. सदानंद याना लगेचच रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मात्र त्यांचा कपाळाची नस तुटल्याचे पोलिसांनी सांगितले.