मारहाण प्रकरणी दोघांना २ महिने कारावासाची शिक्षा

देवरुख:- पत्याचा रमी खेळ खेळताना डाव लागल्याच्या रागातून दोघांनी एकाला मारहाण केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथे घडली होती. या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायाधीशांनी दोघा आरोपींना प्रत्येकी ४ हजार रुपये दंड व २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे.

देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश दीपक शेट्ये, विनोद विनायक बेर्डे (दोघेही रा. मुर्शी, ता. संगमेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत. १९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास दिनेश शेट्ये, विनोद बेर्डे, श्रीकांत भिंगार्डे हे रमी खेळत होते. श्रीकांत भिंगार्डे यांना सतत डाव लागल्याने शेट्ये व बेर्डे त्यांना टोचून बोलत होते. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर भिंगार्डे हे आपल्या घरी जात होते. याचवेळी दिनेश शेट्ये व विनोद बेर्डे यांनी श्रीकांत भिंगार्डे यांना शिवीगाळ, दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच भिंगार्डेना काठीने मारहाण करण्यात आल्याने ते जखमीही झाले होते. शेट्ये व बेर्डे यांच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सबळ पुरावा मिळाल्याने न्यायाधीश ब. द. तारे यांनी दिनेश शेट्ये व विनोद बेर्डे यांना प्रत्येकी ४ हजार रुपये दंड व २ महिने सश्रम कारावास तसेच दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून एस. आर. वनकर, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अतुल जाधव तर कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार एम. आर. बोंद्रे यांनी काम पाहिले. तपास सहाय्यक फौजदार प्रमोद वाघाटे यांनी केला.