Wednesday, June 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मारहाणप्रकरणी चौघांना सहा महिन्यांची शिक्षा

मारहाणप्रकरणी चौघांना सहा महिन्यांची शिक्षा

राजापूर न्यायालयाचा निकाल

राजापूर:- बांबूने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी राजापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. हाके यांनी चारजणांना सहा महिन्यांची साधी कैद आणि एकत्रित दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आत्माराम लक्ष्मण शिंदे, शांताराम लक्ष्मण शिंदे, अनिल आत्माराम शिंदे व अजित आत्माराम शिंदे (सर्व रा. हरळ वारेवाडी, ता. राजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी प्रतीक प्रभाकर शिंदे यांनी फिर्याद दिली होती. आरोपी हरळ वारेवाडीमधील विहिरीवर म्हशी धुवत असताना फिर्यादी प्रतीक शिंदे यांनी त्यांना तुम्ही विहिरीवर म्हशी का धुताय? तुम्ही म्हशी धुतल्या तर पिण्यासाठी पाणी पुरणार नाही, असे सांगितले.

त्याचा राग येऊन आत्माराम लक्ष्मण शिंदे आणि अनिल आत्माराम शिंदे यांनी त्यांना बांबूने मारहाण केली. अजित आत्माराम शिंदे यांनी फिर्यादी यांची बहिणीला मारहाण करून शिवीगाळ केली. तर शांताराम लक्ष्मण शिंदे यांनी फिर्यादी यांचे वडील प्रभाकर सीताराम शिंदे यांना बांबूने मारहाण केली.

राजापूर पोलिसांनी या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने विशेष साहाय्यक सरकारी वकील ओंकार गांगण यांनी नऊ साक्षीदार तपासले. साहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुपेकर यांनी अंतिम युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून प्रथमेश उकार्डे व सचिन बळीप यांनी काम पाहिले.