‘मापात पाप’ प्रकरणी ६४ खटले दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा वैध मापनशास्त्र विभागाने गतवर्षात १२८ टक्के उद्दिष्टपूर्ती करत फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्कातून १ कोटी ७४ लाख २ हजार ४०५ एवढा महसूल मिळवला. मापात पाप करणारी १६४ प्रकरणे नोंदवून ६४ प्रकरणी खटले दाखल केले. खात्यांतर्गत मिटवलेल्या प्रकरणातून १३.३५ लाख उत्पन्न मिळाले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा वैधमापन शास्त्र विभागाने फेरपडताळणी व मुद्रांक शुल्क यांच्या माध्यमातून १ लाख ७४ हजार २ हजार ४०५ एवढा महसूल जमा केला आहे. उपनियंत्रक राम राठोड, सुधीर जोडवेकर आणि भारत धुमाळ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असूनही त्यांनी निरीक्षकांकडून उल्लेखनीय काम करून घेतले. तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या वैधमापन शास्त्र विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार करावी. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा वैधमापन शास्त्र विभागाने वजने व मापे, आवेष्टित वस्तू इ. बाबत नोंदवलेल्या खटल्यांपैकी काही खटले खात्याअंतर्गत मिटवून त्यातूनही १३.३० लाखांचा महसूल मिळवला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यांसाठी असलेल्या या विभागाकडे केवळ ३० टक्के मनुष्यबळ आहे; मात्र, तरीही या विभागाने शुल्क वसुलीचे १२८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.