रत्नागिरी:- आठ दिवसांपासून मान्सून सक्रीय झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातील 30 हून अधिक धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला असून आवश्यकता भासल्यास नदी किनारी परिसरातील भात लावण्यांनाही या पाण्याचा वापर करता येईल. किनारी भागातील विहीरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
राज्यात सर्वात प्रथम मान्सूनने कोकणवर कृपादृष्टी दाखवली असून अद्यापही पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणात सरासरीपेक्षा अधिक साठा झाला आहे. कोकणातील जलसाठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 67 लघु पाटबंधारे प्रकल्पांपैकी 30 हुन अधिक धरणे सध्या भरली असून जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी, खेड तालुक्यातील नातूवाडी, राजापूर तालुक्यातल्या पूर्व भागातील अर्जुना धरण, लांजा तालुक्यातील खोरनिनको धरणासह सर्वच छोटी मोठी धरणे यांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणाच्या सांडव्यावरून सध्या पाणी ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसामध्ये सातत्य राहिल्याने हा परिणाम झाला आहे.
मान्सूनने लहरीपणा दाखविला असल्याने हंगामात काय होणार असा सवाल उपस्थित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यंत सरासरी 1200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीइतकाच पाऊस यंदा पडला आहे. जुनच्या महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत 800 मिमी कमी नोंद होती; परंतु जुलै च्या सुरवातीपासून पावसाचा जोर वाढला. गेल्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस झाला आहे. रत्नागिरी शहराला शीळ धरणातून पाणीपुरठा होतो.या धरणातही सरासरी एवढा पाणीसाठा झाल्याने शहराला आता पाणीटंचाई भासणार नाही. शिवाय पावसामध्ये सातत्य आहे.









