रत्नागिरी:-जिल्ह्यात बिबट्यांचा लोकवस्तीतील वावर मागील पाच वर्षांत वाढला आहे. या कालावधीत जिल्ह्यात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचे ९६३ प्रकार घडले आहेत. यात काही जनावरे बचावली तर बहुतांश जनावरांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याने पादचाऱ्यांवर हल्ले करण्याचेही प्रकारही घडले आहेत.
कोकण रेल्वेमार्ग बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात जंगलातून जातो. या मार्गाच्या बांधणीत जंगली प्राण्यांचे अधिवास नष्ट झाले तसेच गेल्या काही वर्षांत गावागावांतून वृक्षतोडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे ससे, भेकरीसारखी जनावरे जंगलात उरलेली नसल्याने भक्ष्याच्या शोधात बिबटे आता लोकवस्तीकडे वळू लागले आहेत. परिणामी पाळीव जनावरांवरच्या हल्ल्याचे प्रमाण वाढू लागले आहे.पूर्वी बिबट्याचे दर्शन दुर्मिळ असायचे आणि दर्शन झाले तर त्याची चर्चा अनेक दिवस ऐकायला मिळायची; मात्र आजकाल बिबट्याचे दर्शन सर्रास होऊ लागले आहे.
बिबटे फासकीत अडकण्याचे, विहिरीत पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यातील वनविभागाच्या आकडेवारीनुसार २०१७ पासून आजवर जिल्ह्यात वेगवेगळ्या गावात मिळून ९६३ वेळा बिबट्यांचे पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. यात एकाच गावात एकापेक्षा अधिकवेळा हल्लेही झाले आहेत. एकट्या रत्नागिरी तालुक्यात ११३ गावात, संगमेश्वरमध्ये ११६ गावात, लांजात ११० गावात, राजापुरात १५७ गावात, गुहागरमध्ये ५२ गावात, खेडमध्ये १८४ गावात, दापोली तालुक्यात ९८ गावांत तर मंडणगडमध्ये ६३ गावांमध्ये बिबट्याचे हल्ले झाल्याची नोंद आहे.