माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडेंसह चौघांची भाजपतून हकालपट्टी

चिपळुणात पक्षविरोधी काम केल्याने कारवाई

चिपळूण:- नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षरेषेला छेद देणाऱ्या हालचालींवर भारतीय जनता पार्टीने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपाखाली चार पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टी व निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप सतीश मोरे (रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उघडपणे प्रचार करणे, अपक्ष व विरोधी उमेदवारांना पाठबळ देणे, तसेच पक्षाच्या संमतीशिवाय थेट निवडणूक लढविणे या गंभीर बाबींचे ठोस पुरावे आढळून आले. या पार्श्वभूमीवर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयानुसार माजी नगराध्यक्षा सुरेखा नितीन खेराडे (माजी जिल्हाध्यक्षा, महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी) आणि सुधीर सुधाकर पानकर यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर माजी शहराध्यक्ष श्रीराम शंकर शिंदे आणि जिल्हा उपाध्यक्ष परिमल सुरेश भोसले यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पक्षशिस्त ही भाजपची ओळख असून, ती मोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा ठाम संदेश नेतृत्वाने दिला आहे. या कारवाईमुळे चिपळूणमधील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून, येत्या काळात आणखी हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.