रत्नागिरी:- कोरोनामुळे गणपतीपुळेत माघी गणेशोत्सव यात्रा रद्द केली असली तरीही शनिवार, रविवार जोडून सुट्ट्या आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भक्तांची श्रींच्या दर्शनाला प्रचंड गर्दी होती. रविवारी (ता. 14) पाच ते सहा हजार लोकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात्रा रद्द असली तरीही प्रथेप्रमाणे मंदिरात श्री गणेश मुर्तीची पुजा-अर्चा सुरु आहेत.
रविवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने श्रींच्या कलशारोहण विशेष दिनाचे औचित्य साधून देवस्थानचे पंच अमित मेहेंदळे यांच्या हस्त गणेश याग करण्यात आला. संस्थानचे खजिनदार नीलेश कोल्हटकर यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली. उदय शेंडे यांनी देवस्थानतर्फे श्रींना सहस्त्रमोदक अर्पण केले. हा सोहळा नियमित गुरुजींच्या उपस्थितीत झाला. यंदा कोरोनाच्या सावटामुळे माघी गणेशोत्सवाची यात्रा रद्द करण्यात आल्याचे देवस्थानतर्फे जाहीर केले होते. तरीही अनेक भाविकांनी माघी उत्सावाला आरंभ होण्यापूर्वी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगलीसह आजूबाजूच्या परिसरातील आणि स्थानिकांनी दर्शनासाठी सकाळपासून मंदिरात हजेरी लावली होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकाची पावले आपसूकच किनार्याकडे वळत होती. त्यामुळे किनार्यावर समुद्रस्नानासह जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सरसावले होते.
शनिवार आणि रविवार जोडून सुट्ट्यांमुळे माघी उत्सवाच्या पूर्वसंध्येला दर्शनासाठी आणि फिरण्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजणं सरसावले होते. शनिवारी निवासासाठी आलेल्या भाविकांनी रविवारी दर्शन घेतले. रविवारी दिवसभरात सुमारे सहा हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद आहे. यात्रा नसल्यामुळे मंदिर परिसरात स्टॉलची गर्दी नाही. माघी उत्सवाच्या कालावधीत स्टॉल व्यावसायिकांना हजारो रुपयांचे उत्पन्न मिळते. यात्रा रद्द असल्यामुळे त्यावर पाणी फेरले जाणार आहे; मात्र नियमित पर्यटकांचा राबता असल्यामुळे थोडाफार दिलासा कायम आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पर्यटकांचा राबता नसतो; परंतु कोरोनामुळे दिवाळी, नाताळ सुट्टीचा हंगाम हुकल्याने अनेक पर्यटक सध्या या दोन्ही महिन्यात फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. शाळा, महाविद्यालये अजुनही नियमितपणे भरत नसल्याने मध्यमवर्गीय पर्यटक याठिकाणी दाखल होत आहे.