दुसरी लाट ओसरतेय; पॉझिटीव्हीटी रेट 3.41 टक्केपर्यंत
रत्नागिरी:- मागील दहा आठवड्यातील बाधितांची आकडेवारीवरुन कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात पावणेपाच हजार बाधित सापडले होते. जुलैच्या मध्यात ही आकडेवारी पावणेदोन हजारापर्यंत खाली आली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तेराशेच बाधित सापडले आहेत. हा जिल्हावासीयांना दिलासा आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 14.34 टक्केवरुन 3.41 टक्केपर्यंत खाली आला आहे.
जिल्ह्यात दुसर्या लाटेचा प्रभाव मार्च महिन्यात सुरु झाला. आठवड्याला चार ते पाच हजार बाधित सापडू लागले. संगमेश्वर तालुक्यात डेल्टा प्लसचे बाधित आढळल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. मार्च, एप्रिल, मे, जुन या चार महिन्यात कोरोना बाधित सापडण्याचा दर कायम होता. दुसर्या लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात बाधित अधिक होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली. जुनच्या पहिल्या आठवड्यात कडक टाळेबंदी लागु केली होती; मात्र त्याचा परिणाम तितकासा झाला नाही. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून चाचण्या वाढविण्यावर भर दिला होता. सुरवातील दोन ते अडीच हजार चाचण्या होत होत्या. जूनच्या दुसर्या आठवड्यापासून दररोज पाच ते सात हजार चाचण्या करण्याचे नियोजन झाले. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दर दिवशी सायंकाळी झालेल्या चाचण्यांचा आढावा घेण्यास सुरवात केली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शंभर चाचण्यांचे लक्ष देण्यात आले होते. आरोग्य यंत्रणेकडूनही ते लक्ष पूर्ण करण्यात येत होते. बाधित सापडलेल्या गावे, वाड्या उद्रेकजन्य म्हणून जाहीर केली गेली. तेथे कडक निर्बंध लावण्यात होेते. त्याचा परिणाम जुलैच्या तिसर्या आठवड्यापासून दिसू लागला. 36 हजार 772 चाचण्यांमध्ये 1 हजार 471 बाधित सापडले होते. पुढील आठवड्यात बाधितांचा आकडा सापडण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. 1 ते 8 ऑगस्ट या कालावधीत जूनच्या तुलनेत मोठी घट झाली आहे.









